स्वतःची पाठ थोपटताय ना?
आपण
करतोय ते योग्य की अयोग्य, बरोबर की चूक, अशा द्विधा अवस्थेत आपण कधी ना कधी
अडकतोच आणि मग ही द्विधा अवस्था कधीकधी आपल्याला अगदीच हतबल करून टाकते. अशावेळी
आपल्यावरील विश्वास डळमळू न देता आपण एकच करू शकतो. स्वतःला स्वतःची खात्री पटवून
देणे आणि स्वतःच स्वतःच्या मनाला उभारी देणे.
Source : Google Image |
जीव तोडून प्रयत्न करतोय मग तरीही आपल्या वाट्याला निराशा का येते? नक्कीच आपलं काही तरी चुकतंय असं वाटणं स्वाभाविक आहे. याचा अर्थ खरच आपलं चुकतय असा होत नाही तर आपण प्रयत्न करत असलो तरी काही गोष्टींसाठी काळवेळेचं गणितही जमून यायला हवं. मिळणारी गोष्ट योग्य वेळी बरोबर मिळते. त्यासाठी जसा प्रयत्न आणि सातत्य गरजेचे आहे तसेच संयमही गरजेचा आहे. उतावीळ होऊन स्वतःला दोष देत बसाल तर आजपर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. म्हणून जेव्हा केव्हा मनाची द्विधा अवस्था होईल तेव्हा एकच काम करा. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, हे स्वतःला सांगा वारंवार सांगा. मला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्यास उशीर होत असला तरी किंवा ताबडतोब मिळत नसल्या तरी एकदिवस मला हे सगळं मिळणारच आहे कारण, ते माझंच आहे.
यापूर्वीही तुम्ही तुमची छोटी छोटी ध्येयं सध्या केली असतील. यापूर्वीही तुम्ही तुमच्यावर ओढवलेल्या संकटातून मार्ग काढला असेल. आलेले दिवस मागे ढकलत पुढे आला असाल तर या सगळ्या गोष्टींचे एकदा शांत चित्ताने सिंहावलोकन करा. म्हणजे तुमचा डळमळणारा आत्मविश्वास सावरला जाईल.
Source : Google Image |
दिवसातून एकदा तरी आरशात पाहून स्वतःलाच स्माईल द्या आणि I love you म्हणा. जादूचे हे तीन शब्द ऐकवण्यास तुमच्याहून चांगली व्यक्ति जगात दुसरी कुठली असेल तेव्हा आवर्जून दिवसातून एकदा तरी हे कराच.
भूतकाळातील चुकांचे ओझे मनावर रेंगाळत असताना तरी याची खूप म्हणजे खूप गरज आहे. कारण, कोणी नसले तरी मी तुझ्यासोबत आहे, हे वाक्य ऐकण्याची खरी गरज याच वेळी असते मग कोण ऐकवणार हे आपल्याला? आपणच! कारण, आत्तापर्यंत आपणच तर स्वतःला खंबीरपणे साथ देत आलो आहोत. तेव्हा एकदा या स्वतःच्याच साथीबद्दल स्वतःचे आभार माना. त्यानंतर कुठल्या प्रसंगात तुम्हाला कुणाची कशी मदत झाली त्या व्यक्ती आठवा आणि एकदा त्यांच्याबद्दलही मनोमन आभार माना. ही कृतज्ञता तुम्हाला आणखी आणखी खंबीर बनवेल.
चूक की बरोबर, शक्य की अशक्य, योग्य की अयोग्य अशी वजनतागडी खेळताना स्वतःचे महत्त्व किंचितही कमी होऊ देऊ नका.
Love yourself
first and the world will love you!
Comments